गडचिरोली सर्पदंश प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न : अंबादास दानवे
गडचिरोली, 14 ऑगस्ट (हिं.स.) जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर संस्थाचालकांवर कारवाई करून प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) गटाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी शुक्र
रुग्णालयात पाहणी करतांना अंबादास दानवे


गडचिरोली, 14 ऑगस्ट (हिं.स.)

जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर संस्थाचालकांवर कारवाई करून प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) गटाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी शुक्रवारी केला. दानवे यांनी जपतलाई येथे जाऊन आश्रमशाळेची पाहणी केली तसेच मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

१० ऑगस्टला पहाटे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना सर्पदंश झाला. उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थिनींवर अद्याप उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली. मात्र, आश्रमशाळांची नियमित पाहणी करण्याची जबाबदारी असलेले प्रकल्प अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी अद्याप कारवाईच्या कक्षेबाहेर असल्याचा आरोप दानवे यांनी केला.

'८५० चौरस फुटांच्या खोलीत तब्बल ११० मुलींना झोपविण्यात येत होते. ही आश्रमशाळा नसून कोंडवाड्यासारखी अवस्था होती,' असे सांगत दानवेंनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रकल्प अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला आश्रमशाळांची पाहणी करून संस्थेला आवश्यक सूचना देणे आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित होते, असे ते म्हणाले.

जपतलाईकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था असल्याने सुमारे ४५ किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे विद्यार्थिनींना वेळेत उपचार मिळण्यास विलंब झाल्याचा आरोपही दानवेंनी केला. संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून आश्रमशाळांना 'भ्रष्टाचाराचे अड्डे' बनविले असून, अनुदानाचा पैसा कुठे गेला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, २३५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, या कारणाने आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे दानवे म्हणाले. शाळेत प्रशासक नेमून व्यवस्था सुधारावी. या प्रकरणातील फिर्यादीच पहिला आरोपी ठरतो, अशी टीका करत प्रशासन काही अधिकाऱ्यांना वाचवत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचीही या प्रकरणात जबाबदारी असल्याचे दानवे यांनी सांगितले. जपतलाईच्या घटनेनंतर राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या व्यवस्थेत निर्णायक बदल करून विद्यार्थ्यांना समान सुविधा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande