
समस्याग्रस्त व पीडित महिलांना तक्रारी मांडण्यासाठी मिळणार व्यासपीठ
जळगाव, १४ ऑगस्ट (हिं.स.) : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी आणि तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या तक्रारींची शासकीय यंत्रणेमार्फत सोडवणूक व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
जिल्ह्यातील पीडित महिलांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो.
त्यानुषंगाने सोमवार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी आणि संबंधित प्रश्न या व्यासपीठावर मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी दिली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर