कापूसतळणीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था; उघड्या सळाखींमुळे अपघाताचा धोका
बसस्थानक ते गावातील मुख्य वस्तीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे विकासकामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी अमरावती, १४ ऑगस्ट (हिं.स.) : अंजनगावसुर्जी तालुक्यातील कापूसतळणी गावात बसस्थानकावरून मुख्य वस्तीच्या दिशेने जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची मो
कापूसतळणीचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा; उघड्या सळाखींनी अपघाताला निमंत्रण


बसस्थानक ते गावातील मुख्य वस्तीपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे

विकासकामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

अमरावती, १४ ऑगस्ट (हिं.स.) : अंजनगावसुर्जी तालुक्यातील कापूसतळणी गावात बसस्थानकावरून मुख्य वस्तीच्या दिशेने जाणाऱ्या प्रमुख रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून, सिमेंटची झीज झाल्याने लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, हा मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सुमारे दहा वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधींच्या निधीतून एका टप्प्यात बसस्थानक ते गावातील मुख्य वस्तीपर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर योग्य देखभाल न झाल्याने रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत गेली. सध्या अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या पृष्ठभागावरील सळाखी उघड्या पडल्या आहेत.

पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट होते. त्यामुळे ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उघड्या पडलेल्या लोखंडी सळाखींमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

बसस्थानक ते गावातील हा मार्ग पुढे माळीपुऱ्यातून कसबेगव्हाण आणि इतर गावांकडे जात असल्याने या रस्त्यावर ग्रामीण भागातील वाहनधारक तसेच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. माळीपुऱ्यातील रस्त्याची अवस्थाही खराब झाली आहे. अंजनगावसुर्जी तालुक्यात लोकसंख्येच्या दृष्टीने कापूसतळणी हे मोठे गाव असून, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचीही या मार्गावरून नियमित ये-जा असते. असे असतानाही मुख्य रस्ता दुर्लक्षित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक न झाल्याने सध्या प्रशासकीय व्यवस्था सुरू आहे. प्रशासकाच्या अधिकारांबाबत निर्माण झालेल्या न्यायालयीन पेचामुळे विकासकामांसाठी निधी उपलब्ध असूनही अंदाजपत्रकांना मंजुरी मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात येते.

यामुळे हिंदू स्मशानभूमीतील दहन शेड व संरक्षणभिंत, मुस्लिम कब्रिस्तानमधील नमाज ओटा व संरक्षणभिंत, आठवडी बाजारातील ओटे, बसस्थानक ते महात्मा गांधी चौक रस्ता व नाली, गणपती व नवदुर्गा उत्सवाच्या मिरवणुकीचा मार्ग तसेच गावातील इतर खड्डेमय रस्ते आणि नाल्यांच्या बांधकामाची कामे रखडली आहेत.

शासनाने न्यायालयीन आणि प्रशासकीय पेच तातडीने दूर करून रखडलेल्या विकासकामांना मंजुरी द्यावी तसेच बसस्थानक ते गावातील मुख्य वस्तीपर्यंतच्या धोकादायक रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande