रायगड - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती
रायगड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा न्य
Legal Awareness Program at the Government Medical College


रायगड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राधिकरणाच्या सचिव रेवती म. कंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील होत्या. ज्येष्ठ पॅनल वकील अॅड. के. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर तसेच शैक्षणिक जीवनावर होणारे गंभीर परिणाम, कायद्यातील तरतुदी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

रॅगिंगच्या प्रकरणात कारावास व दंडासह महाविद्यालयातून प्रवेश रद्द करणे आणि पुढील प्रवेशावर बंदी यांसारखी कठोर कारवाई होऊ शकते, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. रॅगिंगची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संस्थेच्या प्रमुखांनी नियमानुसार चौकशी करून आवश्यक कारवाई करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पॅनल वकील अॅड. विक्रांत पाटील यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांचा गैरवापर व व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. अमली पदार्थमुक्त भारतासाठी जनजागृती, शिक्षण, प्रतिबंध आणि पुनर्वसनाच्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.

सचिव रेवती म. कंटे यांनी कायद्याचे ज्ञान हे सुरक्षित व जबाबदार समाजनिर्मितीसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत अन्यायाविरोधात कायदेशीर मार्गाने आवाज उठविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील यांनीही विद्यार्थ्यांनी कायद्याची माहिती आत्मसात करून जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक भूमिका बजावावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समाजसेवा अधिकारी नम्रता रणसिंग यांनी केले. सहाय्यक प्राध्यापक डॉ. संतोष बिडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, डॉक्टर, कर्मचारी तसेच विधी स्वयंसेवक सुशील साईकर, पूनम रांजणकर आणि अक्षय सांदणकर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande