

* देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम
- बालचित्रकारांच्या कुंचल्यातून उमटले स्वातंत्र्य, सामाजिक भान आणि विकसित भारताचे रंग
मुंबई, 14 ऑगस्ट (हिं.स.) : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) “रंग स्वातंत्र्याचे, चित्र भविष्याचे” या संकल्पनेवर आधारित शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. म्हाडाच्या वांद्रे (पूर्व) येथील मुख्यालयात आयोजित या स्पर्धेत ५० शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कल्पनाशक्ती आणि कलागुणांच्या माध्यमातून स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि भविष्यातील भारताचे चित्र विविध रंगांतून साकारले.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये वांद्रे पूर्व येथील प्राचार्य जनार्दन लक्ष्मण शिर्सेकर शिक्षण संस्था , महात्मा गांधी विद्यामंदिर मधील इयत्ता ८ वी ते १० वी च्या ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सव म्हणून साजरा न करता नव्या पिढीमध्ये स्वातंत्र्याच्या मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, देश व समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशील विचारांना अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
स्पर्धेसाठी स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता, विविधतेतील एकता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि विकसित भारत या मूल्यांशी निगडित विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून देशाच्या प्रगतीबरोबरच स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक सलोखा, समानता आणि उज्ज्वल भविष्याबाबतचे विचार प्रभावीपणे मांडले.
यावेळी सहभागी बालचित्रकारांना शुभेच्छा देताना श्री. संजीव जयस्वाल म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांच्या हातातील कुंचला हा उद्याच्या भारताला आकार देणाऱ्या विचारांचे प्रतीक आहे. ‘रंग स्वातंत्र्याचे, चित्र भविष्याचे’ या संकल्पनेतून मुलांनी स्वातंत्र्याकडे केवळ अधिकार म्हणून नव्हे, तर देश आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणूनही पाहावे, हा आमचा प्रयत्न असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून मांडलेले विचार हे त्यांच्या सामाजिक सजगतेचे प्रतिबिंब आहेत. कल्पक, संवेदनशील आणि जबाबदार पिढी हीच विकसित भारताची खरी ताकद आहे. सहभागी सर्व बालचित्रकारांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
लाखो कुटुंबांच्या घराच्या स्वप्नाशी जोडलेला असा म्हाडा एक विशाल परिवार आहे. या परिवाराशी भावी पिढीला जोडून त्यांच्यामध्ये समाजाप्रती संवेदनशीलता व जबाबदारीची भावना अधिक दृढ व्हावी, हादेखील या उपक्रमामागील उद्देश होता.
स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि विशेष बॅज प्रदान करून त्यांचे कौतुक करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व पारितोषिके प्रदान करून गौरविण्यात आले.
स्पर्धेतील चित्रांचे परीक्षण अनुभवी परीक्षकांनी केले. रंगसंगती, विषयाची मांडणी, कल्पकता, सामाजिक संदेश आणि एकूण सादरीकरण या निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत उपस्थित शिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी