
बीड, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। आरोग्य संस्था बळकटीकरणासाठी एकात्मिक आरोग्य वर्धीनी समितीची रचना महत्त्वाची असल्याचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी सांगितले.
आज माजलगाव येथे एकात्मिक आरोग्य वर्धीनी समिती बैठक संपन्न झाली. आरोग्य संस्थेचे बळकटीकरण करणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या आरोग्याचा थेट संबंध स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या सक्षम प्राथमिक आरोग्यसेवेशी असतो. हीच प्राथमिक आरोग्यव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून विविध आरोग्यसेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतात. या सेवांचा आढावा, उपलब्ध सुविधांमधील अडचणी आणि आवश्यक सुधारणांबाबत चर्चा करण्यासाठी एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची भूमिका महत्त्वाची ठरते.
असे सांगताना आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, आरोग्यसेवा ही केवळ आजारावर उपचार करण्यापुरती मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, नियमित तपासणी, माता-बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची काळजी आणि वेळेवर उपचार यांना प्राधान्य देणारी असणे आवश्यक आहे. या दृष्टीने स्थानिक पातळीवरील आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली.
प्राथमिक आरोग्य केंद्रे,हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना,जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये आणि स्त्री व ग्रामीण रुग्णालये या आरोग्य संस्था समाविष्ट आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis