मालेगावात मशिदीसह घरांची पोलिसांकडून कसून तपासणी
स्फोटके असल्याच्या गुप्त माहितीवरून मध्यरात्री शोधमोहीम मालेगाव, १४ ऑगस्ट (हिं.स.) : मालेगाव शहरातील इस्लामपुरा भागातील बरकतीया मशिदीसह दोन-तीन घरांमध्ये स्फोटके असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मोठी शोधमोहीम राबवली. दहशतवाद व
मालेगावात मशिदीसह घरांची पोलिसांकडून कसून तपासणी


स्फोटके असल्याच्या गुप्त माहितीवरून मध्यरात्री शोधमोहीम

मालेगाव, १४ ऑगस्ट (हिं.स.) : मालेगाव शहरातील इस्लामपुरा भागातील बरकतीया मशिदीसह दोन-तीन घरांमध्ये स्फोटके असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मोठी शोधमोहीम राबवली. दहशतवाद विरोधी पथक, नाशिक क्राईम ब्रँच, बॉम्बशोध व नाशक पथक, फॉरेन्सिक पथक तसेच घातक कृती दलाच्या जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. सुमारे अडीच ते तीन तास चाललेल्या तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.

पोलिस पथके शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास गोपनीय पद्धतीने इस्लामपुरा भागात दाखल झाली. सुमारे सव्वाशे वर्षे जुनी असलेल्या बरकतीया मशिदीची तसेच संशयित घरांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान बॉम्बशोध पथकासह श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली.

शोधमोहीम गोपनीय असल्याने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना आवश्यक बंदोबस्तासह तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पथक इस्लामपुरा भागात दाखल झाल्यानंतर मशिदीच्या प्रमुखांना तसेच परिसरातील जबाबदार नागरिकांना कारवाईची माहिती देण्यात आली.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही तपासणी आवश्यक असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मशिदीच्या प्रमुखांसह नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केले. मशिदीचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत पोलिसांनी पादत्राणे बाहेर काढून तसेच गालिचे बाजूला करून संपूर्ण मशिदीची तपासणी केली.

यानंतर संशयित घरांचीही कसून झडती घेण्यात आली. परिसरात श्वान पथकाच्या माध्यमातूनही शोध घेण्यात आला. मात्र, कोणतीही संशयास्पद अथवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नसल्याने पोलिस पथकाने अखेर माघारी परतण्याचा निर्णय घेतला.

गुप्त माहिती मालेगावातूनच मिळाल्याची चर्चा

पोलिस महासंचालकांना बरकतीया मशिदीसह काही घरांमध्ये स्फोटके ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. ही गुप्त माहिती मालेगावातूनच देण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. आमदार मौलाना मुफ्ती यांनीही या चर्चेला दुजोरा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

मालेगाव शहरात प्रथमच एखाद्या प्रार्थनास्थळाची अशा प्रकारे व्यापक बंदोबस्तात मध्यरात्री तपासणी करण्यात आल्याने या कारवाईची शहरात जोरदार चर्चा झाली. मात्र, तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू न आढळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande