
बीड, 14 ऑगस्ट (हिं.स.) : रोजगार हमी योजनेतील जुनी आणि अर्धवट राहिलेली कामे तातडीने नव्या प्रणालीत वर्ग करून प्राधान्याने पूर्ण करावीत. ग्रामीण भागातील मजुरांना वेळेत हक्काचा रोजगार मिळण्यासाठी नवीन कामांना तात्काळ सुरुवात करावी, अशा स्पष्ट सूचना राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी रोजगार हमी योजनेतील विविध कामे, मातोश्री पाणंद रस्ते, ग्रामपंचायत भवन, रेशीम उद्योग तसेच भूसंपादनाशी संबंधित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस माजी आमदार संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
अर्धवट कामे नव्या प्रणालीत वर्ग करण्याचे निर्देश
मंत्री गोगावले म्हणाले की, रोजगार हमी योजनेची आता ‘व्हीबी-जी राम जी’ या नव्या संरचनेत प्रभावीपणे वाटचाल करायची आहे. त्यामुळे जुन्या तसेच अर्धवट राहिलेल्या सर्व कामांचे तातडीने नव्या प्रणालीत वर्गीकरण करून ती प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत.
भूसंपादनाशी संबंधित अडचणी लवकरच सोडविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि मागण्यांबाबतचा अहवाल शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
रोजगार हमी योजनेत 318 नवीन कामांचा समावेश
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, त्यात आणखी 318 नवीन कामांचा समावेश करण्यात आल्याची माहिती मंत्री गोगावले यांनी दिली.
मजुरांच्या आर्थिक हिताचा विचार करून कामाची रोजंदारी 317 रुपये करण्यात आली असून, मजुरांना वर्षातून 125 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. जॉबकार्ड असलेल्या मजुराला काम मिळाले नाही, तरी नियमानुसार त्याला रोजगार भत्ता मिळण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात रेशीम तुतीची लागवड समाधानकारक असल्याबद्दल मंत्री गोगावले यांनी संबंधित यंत्रणेचे कौतुक केले. गावांच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी काम करण्याच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील मजुरांना वेळेत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात नवीन कामांना तातडीने चालना द्यावी. कामांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई करू नये, अशा कडक सूचनाही त्यांनी दिल्या.
इमामपूर येथील पाणंद रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी
दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांनी इमामपूर येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याने या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मंत्री गोगावले यांनी सुरू असलेल्या कामाचा दर्जा तपासून पाहिला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis