गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) स्वतःहून दखल घेतली आहे. या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृ
NHRC takes suo motu cognizance snakebite incident MH Gadchiroli district


नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) स्वतःहून दखल घेतली आहे. या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याचे, तर अन्य तीन विद्यार्थिनींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वृत्त आहे.

यासंदर्भात 11 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वसतिगृहात खाटांची कमतरता असल्याने विद्यार्थिनींना जमिनीवर झोपावे लागत होते. सर्पदंशाच्या घटनेच्या वेळी एका खोलीत तब्बल 79 विद्यार्थिनी राहत असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

या वृत्तातील तथ्ये खरी आढळल्यास हा प्रकार मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा ठरू शकतो, असे आयोगाने निरीक्षण नोंदवले आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित होत आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली असून, प्रकरणाबाबत दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवालात सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या प्रकृतीची सद्यस्थिती तसेच त्यांच्या उपचारांची माहिती समाविष्ट करण्यास सांगण्यात आले आहे.

गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या वसतिगृहात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचेही संबंधित वृत्तात म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या संख्येने सर्पदंशाच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही या प्रकरणामुळे ऐरणीवर आला आहे.आयोगाच्या अहवालानंतर या घटनेतील वस्तुस्थिती आणि संबंधित यंत्रणांची जबाबदारी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande