
मीनल पाटील खतगावकर यांनी उपाध्यक्षपदाचा स्वीकारला पदभार
नांदेड, 14 ऑगस्ट (हिं.स.) : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार डॉ. तुषार राठोड आणि उपाध्यक्ष मीनल पाटील खतगावकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांच्या हस्ते पदभार स्वीकारला.
यावेळी बोलताना उपाध्यक्ष मीनल पाटील खतगावकर म्हणाल्या की, ही जबाबदारी केवळ पदाची नसून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाची आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि सुलभ कर्जपुरवठा करणे, पीक कर्जासह विविध कर्ज योजनांचा प्रभावी लाभ मिळवून देणे तसेच बँकेच्या विविध सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा मानस असल्याचे खतगावकर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून बँकेच्या प्रगतीसोबतच प्रत्येक सभासदाचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमास आमदार अमरनाथ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी उपमहापौर सरजीतसिंग गिल, किशोर स्वामी, बँकेचे संचालक मंडळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis