ऑस्ट्रियातील आईस स्टॉक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये निसर्गा गावळीची चमकदार कामगिरी
कांस्यपदकासह जागतिक क्रमवारीत सातवे स्थान रायगडच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा रायगड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील मानिवली गावची कन्या कु. निसर्गा दिलीप गावळी हिने आंतरराष्ट्रीय आईस स्टॉक स्पोर्ट्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रायगड ज
Nisarga Gawali from Karjat shines in the international sports arena.


कांस्यपदकासह जागतिक क्रमवारीत सातवे स्थान

रायगडच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

रायगड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : कर्जत तालुक्यातील मानिवली गावची कन्या कु. निसर्गा दिलीप गावळी हिने आंतरराष्ट्रीय आईस स्टॉक स्पोर्ट्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ऑस्ट्रिया येथे झालेल्या युरोपियन आईस स्टॉक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत निसर्गाने कांस्यपदकाची कमाई केली. यासोबतच जागतिक क्रमवारीत सातवे स्थान मिळवत तिने आपल्या क्रीडा कौशल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडली आहे.

निसर्गा गावळी हिने ICS Stock Sports या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील खेळाडूंशी आत्मविश्वासाने सामना करत तिने उत्कृष्ट कामगिरी बजावली. तिच्या या यशामुळे कर्जत तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागातून पुढे येत निसर्गाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद मानले जात आहे. मर्यादित साधनसुविधांवर मात करत सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे आईस स्टॉक स्पोर्ट्स या तुलनेने नव्या क्रीडा प्रकाराकडेही युवकांचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.

निसर्गाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रायगड जिल्ह्यातील नागरिक, क्रीडाप्रेमी, मित्रपरिवार तसेच विविध मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यातही निसर्गाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी तिला शुभेच्छा देण्यात येत आहेत.

----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande