संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे नाशिकमध्ये आगमन
नाशिक, 14 ऑगस्ट (हिं.स.)। श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या पायी प्रवासाला निघालेल्या विश्वगुरू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी नाशिक शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ४८ दिवसांचा परतीचा पाय
Nivruttinath Maharaj's palanquin


नाशिक, 14 ऑगस्ट (हिं.स.)। श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे परतीच्या पायी प्रवासाला निघालेल्या विश्वगुरू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी नाशिक शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ४८ दिवसांचा परतीचा पायी प्रवास करून पालखी सायंकाळी पिंपळगाव बहुला येथे मुक्कामी पोहोचली.

पालखीचे नाशिक शहरात आगमन होताच विविध ठिकाणी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करीत वारकऱ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक संस्था, भजनी मंडळे तसेच भाविकांनी विणेकरी, टाळकरी, झेंडेकरी, चोपदार, रथसेवक, रथसजावटकार, तुळशीधारक आणि ग्रंथधारक महिला वारकऱ्यांचेही स्वागत केले.

शुक्रवारी सकाळी सात वाजता चेहडी येथून पालखीरथाने नाशिकच्या दिशेने प्रस्थान केले. नाशिकरोड परिसरात पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखीरथ विहितगाव येथील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दाखल झाला. याठिकाणी पालखीचे पूजन करण्यात आले. भाविकांसाठी दुपारच्या भोजनाची पंगत आयोजित करण्यात आली होती. भोजनानंतर पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. वडनेर गेट आणि पिंपळगाव खांब येथेही पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी पाथर्डी गावात दाखल झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जेसीबीमधून पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. पाथर्डी ग्रामस्थांच्या वतीने पालखी मारुती मंदिरात दर्शनासाठी थांबविण्यात आली. यावेळी ग्रामस्थ आणि भाविकांनी पालखीचे दर्शन घेत स्वागत केले.

यानंतर पालखी पाथर्डी फाटा, अंबड गावमार्गे एक्सलो पॉइंट येथे पोहोचली. येथे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी पपया नर्सरी मार्गे सायंकाळी पिंपळगाव बहुला येथे मुक्कामासाठी रवाना झाली.पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पालखी मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला .

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande