नागपुरात 16 ऑगस्ट रोजी अवयवदान जनजागृती कार्यक्रम
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती नागपूर, 14 ऑगस्ट (हिं.स.) : देशात अवयवदानाबाबत असलेली अनास्था दूर करून सर्वसामान्यांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नागपुरात रविवारी, 16 ऑगस्ट रोजी विशेष ‘अवयवदान जनजागृती
अवयवदान लोगो


पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर, 14 ऑगस्ट (हिं.स.) : देशात अवयवदानाबाबत असलेली अनास्था दूर करून सर्वसामान्यांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नागपुरात रविवारी, 16 ऑगस्ट रोजी विशेष ‘अवयवदान जनजागृती कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला आहे. असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया (एपीआय) विदर्भ चॅप्टर, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (झेटीसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत, उत्तर अंबाझरी रोड, रामदासपेठ येथील आयएमए हाऊस येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी ५०० आसनक्षमतेचे सभागृह आरक्षित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून झेडटीसीसी नागपूरचे प्रमुख डॉ. मनीष श्रीगिरीवार तसेच आरटीओ आयुक्त बीडकर उपस्थित राहणार आहेत.

अवयवदानानंतर अवयव वेळेत संबंधित रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ची भूमिका महत्त्वाची असते. या प्रक्रियेत पोलीस आणि आरटीओ विभागाचे योगदान महत्त्वाचे असल्याने या दोन्ही विभागांतील वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.

एपीआय विदर्भ चॅप्टरच्या चेअरमन डॉ. तनुजा मनोहर आणि सायंटिफिक कमिटीच्या प्रमुख डॉ. मंजूषा मार्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम केवळ व्याख्यानांपुरता मर्यादित राहणार नाही. अवयवदानाची प्रक्रिया नागरिकांना अधिक सोप्या पद्धतीने समजावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमातील प्रमुख उपक्रम

नाटिका :- रुग्णाला ‘ब्रेन डेड’ कसे घोषित केले जाते, अवयवदानाची कायदेशीर प्रक्रिया काय असते आणि अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशा पद्धतीने पोहोचविले जातात, याचे सादरीकरण नाटिकेद्वारे करण्यात येणार आहे.

कविता सादरीकरण : - अमेरिकेतील प्रसिद्ध ‘To Remember Me’ या कवितेचे डॉ. सुनंदा चाऊजी यांनी केलेले मराठी भाषांतर सादर केले जाणार आहे.

संवाद व अनुभव :- अवयवदाते आणि अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांमध्ये थेट संवाद आयोजित करण्यात येणार असून, त्यांच्या अनुभवांमधून अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.

माहिती स्टॉल्स : -कार्यक्रमस्थळी ‘मोहन फाउंडेशन’ आणि ‘माधव नेत्रपेढी’चे माहिती स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. येथे नागरिकांना अवयवदानासाठी अर्ज कसा भरावा आणि नोंदणी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.

हा कार्यक्रम मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये होणार असून अवयवदानाबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अवयवदानातून गरजू रुग्णांना जीवनाची नवी संधी मिळू शकते. त्यामुळे नागरिकांनी या जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित राहून अवयवदानाविषयी माहिती जाणून घ्यावी आणि जनजागृतीच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande