यवतमाळमध्ये १ लाखांहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित
अनिश्चित पावसामुळे खरीप हंगाम अडचणीत बँकांकडून उद्दिष्टाच्या केवळ ४६.४ टक्के कर्जवाटप यवतमाळ, १४ ऑगस्ट (हिं.स.) : सुपर अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसाचे चक्र अनिश्चित झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारा ठरत आहे. एकीकडे पिके व
एक लाखावर शेतकरी पीककर्ज विना:46 टक्क्यावरच अडली वाटपाची गाडी,


अनिश्चित पावसामुळे खरीप हंगाम अडचणीत

बँकांकडून उद्दिष्टाच्या केवळ ४६.४ टक्के कर्जवाटप

यवतमाळ, १४ ऑगस्ट (हिं.स.) : सुपर अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसाचे चक्र अनिश्चित झाल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारा ठरत आहे. एकीकडे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना दुसरीकडे बँकांकडून पीक कर्ज वितरणाचा वेग मंदावल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. ऑगस्ट महिन्याचा निम्मा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील १ लाखांहून अधिक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा अस्मानी संकटासोबतच सुलतानी संकटाचाही सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आर्थिक नियोजनासाठी महत्त्वाचा मानला जातो. यंदा जिल्ह्यातील २ लाख १२ हजार ३०० शेतकरी सभासदांना २ हजार २०० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने बँकांना दिले होते. मात्र आतापर्यंत बँकांनी उद्दिष्टाच्या केवळ ४६.४ टक्के कर्जाचे वितरण केले आहे. त्यानुसार १ लाख ११ हजार २७९ शेतकरी खातेदारांना १ हजार २०० कोटी १४ लाख रुपयांचे पीक कर्ज मिळाले आहे.

कर्जमाफीमुळे कर्जवाटपाला गती येण्याची शक्यता

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीत समाविष्ट जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. यामध्ये सहकारी बँकेच्या ३१ हजार ६३१ शेतकरी सभासदांचा समावेश असून, त्यांना २५३ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

कर्जमाफीची रक्कम बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाल्याने रखडलेल्या पीक कर्ज वितरण प्रक्रियेला आता काही प्रमाणात गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जुन्या कर्जाच्या परतफेडीचा तगादा

गेल्या वर्षीच्या पीक कर्जाची परतफेड झालेली नसल्याचे कारण पुढे करत काही बँकांकडून यंदाच्या पीक कर्ज वितरणात दिरंगाई होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. खरीप हंगामासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून, जुन्या कर्जाच्या परतफेडीचा तगादा आणि नव्या कर्जाची गरज अशा दुहेरी कोंडीत अनेक शेतकरी सापडले आहेत.

कृषी निविष्ठांसाठी खासगी कर्जाचा आधार

सध्या शेतकऱ्यांकडून खत, युरिया आणि फवारणीची औषधे खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. मात्र हातात पुरेसा पैसा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कृषी केंद्र चालक, खासगी फायनान्स कंपन्या, सावकार किंवा इतरांकडून उधारीवर पैसे उभे करावे लागत असल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे.

उधारीच्या पैशांवर शेतीचा खर्च भागवताना शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार आणखी वाढत आहे. त्यामुळे अनिश्चित पाऊस, वाढता शेती खर्च आणि पीक कर्जाच्या मर्यादित उपलब्धतेमुळे यंदाचा खरीप हंगाम यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक कसोटीचा ठरत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande