
अखंड भारत संकल्प दिना’निमित्त राष्ट्रीय एकात्मता व बंधुभावाचा संदेश
परभणी, १४ ऑगस्ट (हिं.स.) : शिवाजीनगर येथील एन. व्ही. एस. मराठवाडा हायस्कूलमध्ये १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिवस’ तसेच ‘अखंड भारत संकल्प दिन’ विविध उपक्रमांनी पाळण्यात आला. फाळणीच्या काळातील वेदना, विस्थापन आणि नागरिकांनी भोगलेल्या यातनांचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता व बंधुभावाचा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे कोषाध्यक्ष श्रीनिवासजी मुंदडा होते. प्रमुख उपस्थिती म्हणून नूतन विद्या समितीचे सहसचिव तथा प्रशालेचे मुख्याध्यापक अनंत पांडे, पर्यवेक्षक शिवाजी अरळकर, सूर्यकांत पाटील तसेच सुनील रामपूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी इयत्ता सहावी ‘ब’ची विद्यार्थिनी मुक्ता ठिगळे हिने अखंड भारताच्या संकल्पनेची जाणीव करून देणारे वैयक्तिक गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रूपेशजी यादव यांनी मार्गदर्शन करताना अखंड भारताच्या संकल्पनेविषयी विचार मांडले. “भारत पुन्हा एकसंघ आणि वैभवशाली राष्ट्र म्हणून उभे राहण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रहित, एकता आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकातून मुख्याध्यापक अनंत पांडे यांनी फाळणीच्या काळात हजारो नागरिकांना भोगावे लागलेले दुःख, मनस्ताप आणि विस्थापन यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. इतिहासातील या वेदनादायी घटनेचे स्मरण ठेवत भविष्यात समाजात एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एकात्मता व बंधुभाव जपण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाची सांगता विशाल धानोरकर व त्यांच्या संचाने सादर केलेल्या सामूहिक ‘वंदे मातरम्’ने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत कुलकर्णी यांनी केले, तर सुनील रामपूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीपाद कुलकर्णी, गोपाळ रोडे, विश्वास दिवाळकर, शिवप्रसाद कोरे, गणेश सूर्यवंशी, सागर सुडके, अमोल गोरकट्टे, अविनाश कंधारकर, अविनाश जाधव, प्रशांत डाफने, वसंत पुरी आणि शिवराम कटारे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis