
गडचिरोली., 14 ऑगस्ट (हिं.स.) | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून घोषित करण्यात येणाऱ्या मानाच्या पोलीस पदकांमध्ये गडचिरोली पोलीस दलाने पुन्हा एकदा आपल्या शौर्याचा आणि उत्कृष्ट सेवेचा ठसा उमटवला आहे. माओवाद्यांविरोधात प्राणांची बाजी लावून लढा देणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील २० पोलीस अधिकारी व अंमलदारांना मा. राष्ट्रपतींचे 'पोलीस शौर्य पदक' आणि ०१ अधिकाऱ्यास 'गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक' जाहीर झाले आहे. याशिवाय, गृह मंत्रालय (भारत सरकार) कडून पोलीस दलात २५ वर्षांपेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावणाऱ्या २७ अंमलदारांना 'अतिउत्कृष्ट सेवा पदक' तर १५ वर्षांपेक्षा अधिक निष्कलंक सेवेसाठी ०३ अधिकारी व अंमलदारांना 'उत्कृष्ट सेवा पदक' जाहीर झाले आहे.
चकमकीत ६ माओवाद्यांना घातले होते कंठस्नान
सन २०२३ मध्ये भामरागड तालुक्यातील केडमारा आणि सन २०२४ मध्ये कंत्रनगट्टा येथे पोलीस व माओवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी एकूण ०६ जहाल माओवाद्यांचा सफाया केला होता. या दोन्ही अत्यंत धाडसी आणि यशस्वी अभियानांत स्वतःचा जीव धोक्यात घालून अप्रतिम शौर्य दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना व अंमलदारांना या शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
पोलीस शौर्य पदक विजेते वीर अधिकारी व अंमलदार:
१. यतिश विजयराव देशमुख (तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक (अभियान), गडचिरोली; सध्या पोलीस अधीक्षक, पालघर) २. राजू पांडुरंग गवळी (सहाय्यक पोलीस निरीक्षक) ३. वासुदेव राजम मडावी (सहाय्यक पोलीस निरीक्षक) ४. दिलीप विठ्ठल आत्राम (पोलीस हवालदार/५०७४) ५. मासा बोरा आत्राम (पोलीस हवालदार/३०३२) ६. विजय किष्टय्या कोडापे (पोलीस हवालदार/२६४३) ७. दशरथ रामशहा मडावी (नाईक पोलीस अंमलदार/५०७२) ८. अजय गोपालराव मडावी (पोलीस अंमलदार/५७२४) ९. गणेश चंद्रम डुब्बुला (पोलीस अंमलदार/५७८२) १०. विजय झुरु मडावी (पोलीस अंमलदार/५९६०) ११. भुपेश मारोतराव जुमनाके (पोलीस अंमलदार/५९०१) १२. राकेश राजम बेडकी (पोलीस अंमलदार/४६३६) १३. सुधाकर जगन पोरतेट (पोलीस अंमलदार/५६२१) १४. श्रीनिवास समय्या निष्ठुरी (पोलीस अंमलदार/५५६३) १५. गणेश हनमंतू गंजीवार (पोलीस अंमलदार/४६२९) १६. नितेश प्रभुदास टेंभेकर (पोलीस अंमलदार/५५२९) १७. शिवाजी मेस्सो हिचामी (पोलीस अंमलदार/५५८७) १८. संजय मल्लेश कंकाबंडावार (पोलीस अंमलदार/५८८४) १९. राजेश शामराव किरंगे (पोलीस अंमलदार/१२६) २०. दलसु कटिया बोगामी (पोलीस अंमलदार/५१६७)
मागील ५ वर्षांतील शौर्याचा आलेख:
गडचिरोली पोलीस दलाच्या शिरपेचात दरवर्षी सन्मानाचा तुरा रोवला जात आहे. एकट्या २०२६ या वर्षात गडचिरोली पोलिसांना एकूण ३१ पोलीस शौर्य पदके प्राप्त झाली आहेत. तर मागील पाच वर्षांच्या प्रवासाचा विचार केल्यास गडचिरोली दलाने ०३ शौर्य चक्र, २३७ पोलीस शौर्य पदके आणि ०७ गुणवत्तापूर्ण सेवा पदके पटकावून संपूर्ण देशात आपली एक वेगळी आणि स्वाभिमानी ओळख निर्माण केली आहे.
गडचिरोली, पोलीस अधीक्षक एम. रमेश म्हणाले की, गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी अत्यंत खडतर परिस्थितीत दाखवलेले धैर्य आणि दिलेले योगदान अभिमानास्पद आहे. पदकप्राप्त सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond