रत्नागिरी : महिलेचे प्राण वाचविण्यात पोलिसांच्या 112 हेल्पलाइनची मदत
रत्नागिरी, 14 ऑगस्ट (हिं.स.) । मध्यरात्री अचानक प्रकृती गंभीर झालेल्या नेपाळी महिलेच्या मदतीसाठी मंडणगड पोलिसांनी तातडीने धाव घेत महिलेचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रिक्षा आणि रुग्णवाहिका उपलब्ध होत नसताना नागरिकाने केलेला ‘११२’ हेल
रत्नागिरी : महिलेचे प्राण वाचविण्यात पोलिसांच्या 112 हेल्पलाइनची मदत


रत्नागिरी, 14 ऑगस्ट (हिं.स.) । मध्यरात्री अचानक प्रकृती गंभीर झालेल्या नेपाळी महिलेच्या मदतीसाठी मंडणगड पोलिसांनी तातडीने धाव घेत महिलेचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रिक्षा आणि रुग्णवाहिका उपलब्ध होत नसताना नागरिकाने केलेला ‘११२’ हेल्पलाइनवरील फोन या महिलेसाठी जीवनदायी ठरला.

मंडणगडमधील सीएनजी पेट्रोल पंपाजवळील क्लासिक फार्म हाऊस येथे गेल्या अनेक वर्षांपासून एक नेपाळी कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील एका महिलेला रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आकडी आल्यासारखे होऊन तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी चादरीच्या सहाय्याने चार जणांच्या मदतीने तिला रस्त्यापर्यंत आणले.

रात्रीची वेळ असल्याने रिक्षाचालकांशी संपर्क साधूनही कोणी मदतीसाठी येण्यास तयार नव्हते. रुग्णवाहिकेशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिक राजेश पारेख यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने ‘११२’ आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधला.

कॉल मिळताच पोलीस कर्मचारी पहुरकर, पारधी, पीएसआय शीत, पोलीस हवालदार सुकाळे आणि चालक रामसिंग पवार यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आवश्यक सहकार्य करत महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने तिला पुढील उपचारासाठी माणगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

माणगाव येथे महिलेची एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर दोन दिवस आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. उपचारांना प्रतिसाद मिळाल्यानंतर महिलेची प्रकृती सुधारली असून ती आता आपल्या कुटुंबीयांसह मंडणगड येथे सुखरूप परतली आहे.

मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि उपचारासाठी मदत करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल राजेश पारेख यांनी आभार मानले. आपत्कालीन परिस्थितीत ‘११२’ क्रमांकावर संपर्क साधल्यास गरजू नागरिकांना तातडीने मदत मिळू शकते, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande