
पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
पुणे महापालिकेच्या प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी खडकवासला येथील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राची (सीडब्ल्यूपीआरएस) सुमारे २.५ हेक्टर जागा मिळण्याची शक्यता आहे. ही जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत.पुढील काही महिन्यांत ही जागा महापालिकेला उपलब्ध होण्याची शक्यता असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेत समाविष्ट झालेल्या १६ गावांतील सुमारे १३ लाख नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे समाविष्ट गावांमधील नागरिकांना महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.खडकवासला येथील सीडब्ल्यूपीआरएसमध्ये लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रादेशिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेदरम्यान महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सीडब्ल्यूपीआरएसची सुमारे २.५ हेक्टर जागा २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मांडला.या संदर्भात सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक सेल्वा बालन यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी महापालिकेच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्रकल्पासाठी जागा मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.जागा उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता असून, समाविष्ट गावांच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु