


रायगड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या वतीने रायगड जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमांतर्गत अलिबाग समुद्रकिनारी गुरुवारी जिल्हास्तरीय पाच किलोमीटर अंतराची रेड रन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १७ ते २५ वयोगटातील २५ युवक आणि १६ युवतींनी सहभाग घेतला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रथम युवकांच्या, त्यानंतर युवतींच्या स्पर्धेला सुरुवात केली. युवक गटात स्वागत समिर पाटील याने प्रथम, अक्षय राजा लेंडी याने द्वितीय, तर यश दत्ताराम म्हात्रे याने तृतीय क्रमांक मिळविला. युवती गटात करिष्मा प्रकाश म्हात्रे प्रथम, मुग्धा नरेश पाटील द्वितीय, तर करिष्मा यशवंत हिरवे तृतीय क्रमांकावर राहिल्या.
विजेत्यांना अनुक्रमे २,५००, २,००० आणि १,५०० रुपयांचे रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ. निहा राऊत यांनी सहभागी विद्यार्थ्यांना पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था केली, तर पोलिस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. संगमेश्वर महाजन, सहायक क्रीडा विकास अधिकारी देविदास पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग स्कूल येथे एचआयव्ही/एड्स विषयावरील प्रश्नमंजुषा स्पर्धा झालीे. तसेच १८ ऑगस्ट रोजी रुग्णालयापासून शहरातील प्रमुख मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. एचआयव्हीविषयी शास्त्रीय माहिती, गैरसमज, कलंक व भेदभाव दूर करण्यासाठी जिल्ह्यातील ३०० गावे, ३२० शाळा आणि ६५ महाविद्यालयांत विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)