
धाराशिव, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
धाराशिव तालुक्यातील कनगरा व धुत्ता येथील शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उभ्या पिकांबाबत पवनचक्की कंपनीकडून सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली..
पवनचक्की प्रकल्पाच्या कामासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमधून परस्पर वाहने घालून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करण्यात आले आहे. तसेच कोणतीही पूर्वसूचना, नोटीस किंवा योग्य माहिती न देता शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर केला जात असल्याच्या गंभीर तक्रारी शेतकऱ्यांनी आपल्याकडे मांडल्या होत्या. यासोबतच, पोलिस प्रशासनाने परिस्थितीची वस्तुनिष्ठ शहानिशा न करता कंपनीची बाजू घेतली आणि शेतकऱ्यांशी उद्धटपणे वागल्याच्या तक्रारीही शेतकऱ्यांनी केल्या होत्या, या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते..
शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या शेतात प्रवेश करणे, उभी पिके उद्ध्वस्त करणे किंवा त्यांच्या जमिनीचा वापर करणे याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कनगरा व धुत्ता येथील नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी, जमिनीच्या वापराची चौकशी, कंपनीने केलेल्या कामांची कायदेशीरता आणि पोलिस प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या..
विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही. पवनचक्क्या उभ्या करायच्या असतील तर त्या कायद्याच्या चौकटीत आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचा सन्मान करूनच उभ्या राहिल्या पाहिजेत, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवरून वाहने घालून नाहीत. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी कंपनी कितीही मोठी असली तरी ती शेतकऱ्यांच्या हक्कांपेक्षा मोठी नाही, हे प्रशासनाने लक्षात घेऊन भूमिका घेतली पाहिजे.
शेतकऱ्यांच्या तक्रारी अत्यंत गंभीर असून, कंपनीला कायद्यापेक्षा मोठे समजून मनमानी करण्याची मुभा प्रशासनाने देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोकर, आरडीसी कडवकर, एसडीओ देशमुख, एपीआय दहिफळे, नायब तहसीलदार शिंदे तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis