
नवी दिल्ली , 14 ऑगस्ट (हिं.स.)।कॉमेडियन समय रैनाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त आणि असंवेदनशील वक्तव्यांप्रकरणी समय रैना आणि अन्य चार जणांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत.
याचिकाकर्त्या एनजीओने न्यायालयाला सांगितले की, समय रैना आता त्यांच्या संपर्कात असून स्पाइनल मस्क्युलर अॅट्रॉफी (एसएमए) या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या यशोगाथांचा प्रचार करण्यासाठी ते तयार आहेत. त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. एसएमएग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी सरकारला आवश्यक निर्देश देण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय पुढील सुनावणी सुरू ठेवणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, समय रैना आणि इतरांनी दिव्यांग व्यक्तींसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचा तसेच निधी उभारण्याचा प्रयत्न केला आहे. न्यायालयाने म्हटले, “जेव्हा प्रामाणिक प्रयत्न केले जातात, तेव्हा चांगले परिणाम नक्कीच मिळतात. हे सर्व अतिशय प्रतिभावान तरुण आहेत. त्यांनी योग्य दिशेने काम करण्यास सुरुवात केली असेल, तर त्याचे परिणामही चांगलेच असतील.”
याशिवाय, खंडपीठाने सांगितले की, दिव्यांग व्यक्तींकडून अशा प्रकारच्या कंटेंटवर अधिक चांगले नियंत्रण कसे ठेवता येईल, याबाबत सूचना घेण्यासाठी आणि त्यानुसार आवश्यक निर्देश तयार करण्यासाठी या प्रकरणाची पुढील सुनावणीही केली जाईल. खंडपीठाने म्हटले की, “प्रतिवादी क्रमांक ६ ते १० (आरोपी कॉमेडियन) यांच्याशी संबंधित प्रकरण बंद करण्यात येत आहे. सर्व आरोपींविरोधातील फौजदारी कारवाई रद्द करण्यात येत आहे. त्याच्याशी संबंधित इतर सर्व कार्यवाहीही समाप्त करण्यात येत आहे. व्यापक मुद्द्यावर निर्देश जारी करण्यासाठी हे प्रकरण पुन्हा सूचीबद्ध केले जाईल.”
दरम्यान, ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा संबंधित भाग १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईतील खार येथील हॅबिटॅटमध्ये शूट करण्यात आला होता. त्यानंतर हा भाग प्रसारित करण्यात आला. या शोमध्ये सहभागी असलेल्या अनेक इन्फ्लुएन्सर्स आणि कॉमेडियन्सवर दिव्यांग व्यक्तींविषयी असंवेदनशील टिप्पणी केल्याच्या आरोपावरून विविध ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात यूट्यूबर रणवीर इलाहाबादियाची याचिका अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी ज्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामध्ये रणवीर इलाहाबादियाचाही समावेश होता.
स्वतःविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये दिलासा मिळावा यासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित आहे. यापूर्वी न्यायालयाने त्याला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode