
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र (WTP) येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
शहरातील नागरिकांना शाश्वत, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीत प्रकल्पातील पूर्ण झालेली कामे, प्रगतीपथावर असलेली कामे तसेच प्रलंबित कामांचा टप्पानिहाय आढावा घेण्यात आला. जलशुद्धीकरण केंद्रातील कामांची प्रगती, आवश्यक यंत्रसामग्री, तांत्रिक बाबी, जलवाहिनीचे काम, पाणी शुद्धीकरण क्षमता आणि प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने, वेळेचे काटेकोर नियोजन करून आणि गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता कामे पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
प्रत्येक टप्प्याची नियमित पाहणी करून प्रगती अहवाल सादर करावा, आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि संसाधनांचा प्रभावी वापर करावा, तसेच प्रलंबित बाबींचा तातडीने निपटारा करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.
शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अधिक सक्षम आणि शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
बैठकीस मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी, प्रकल्पाचे कंत्राटदार GVPR Engineers Limited कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis