
सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालकाला पैशाचे आमिष दाखवल्याप्रकरणी प्रमुख संशयित श्रीशैल हुळ्ळे याला सदर बझार पोलिसांनी कोल्हापूरातील किणी टोलनाक्यावरून पहाटे अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
आमदार कल्याणशेट्टी यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी त्यांच्या चालक आनंद सुरवसे याला पैशाचे आमिष दाखवल्याप्रकरणी श्रीशैल हुळ्ळे (रा. वडदेगाव, ता. दक्षिण सोलापूर; सध्या रा. मणिधारी हेरिटेज, अक्कलकोट रोड, सोलापूर) आणि प्रभाकर हणमंत फुलारी (वय २३, रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) यांच्याविरोधात सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.याप्रकरणी प्रभाकर फुलारी याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीशैल हुळ्ळे फरार होता. त्याच्या शोधासाठी सदर बझार पोलिस तसेच गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली होती.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना हुळ्ळेच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली. त्यानंतर सदर बझार पोलिसांनी त्याचा पाठलाग करून कोल्हापूरातील किणी टोलनाक्याजवळ त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने हुळ्ळेला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड