आयसीयू खाटांच्या तुटवड्यावर उपाय; ससूनमध्ये २० नवीन खाटांना मंजुरी
पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)। पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून येणाऱ्या गंभीर रुग्णांचा भार असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटांची कमतरता दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. अतिदक्षता
sasoon


पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून येणाऱ्या गंभीर रुग्णांचा भार असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील खाटांची कमतरता दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या ३४ ने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडे पाठवण्यात आला आहे. यापैकी २० नवीन खाटांना मंजुरी मिळाली आहे.ससून रुग्णालयात सध्या अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज असलेल्या गंभीर रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णालयातील विविध नऊ विभागांमध्ये मिळून सध्या अतिदक्षता विभागाच्या १६२ खाटा उपलब्ध आहेत. मात्र, गंभीर रुग्णाला ऐनवेळी खाट उपलब्ध न झाल्यास त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.अतिदक्षता विभागात खाट उपलब्ध न झाल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आल्यानंतर या प्रश्नाचे गांभीर्य समोर आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने अतिदक्षता विभागाचा विस्तार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.प्रस्तावित ३४ नवीन खाटांपैकी २० खाटांना मंजुरी मिळाल्याने ससूनमधील गंभीर रुग्णांसाठी उपचाराची क्षमता वाढणार आहे. उर्वरित खाटांसाठीही आवश्यक प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande