
जळगाव, 14 ऑगस्ट (हिं.स.) सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य तंबाखूमुक्त करण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालये तसेच ग्रामपंचायत, शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व त्याचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करून तंबाखूमुक्तीची शपथ घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच अधिनस्त कार्यालये व परिसर धुम्रपानमुक्त व तंबाखूमुक्त घोषित करून घोषणापत्र जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘धूरमुक्त किंवा तंबाखूमुक्त गाव’ तसेच ‘धूरमुक्त किंवा तंबाखूमुक्त जिल्हा’ ही मोहीमही राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम शालेय शिक्षण, गृह व आरोग्य विभाग तसेच सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून तंबाखूमुक्त समाज निर्मितीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा तंबाखु नियंत्रण समन्वय समितीचे अध्यक्ष रोहन घुगे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर