तिरुचानूरच्या पद्मावतीदेवीला सोलापुरातून यंदाही ‘माहेरची साडी’
सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.) : तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरातील ब्रह्मोत्सवानिमित्त सोलापुरातील पद्मशाली बांधवांकडून यंदाही पद्मावतीदेवीला माहेरची साडी अर्पण करण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी हा धार्मिक कार्यक्रम होणार असल्
तिरुचानूरच्या पद्मावतीदेवीला सोलापुरातून यंदाही ‘माहेरची साडी’


सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.) : तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरातील ब्रह्मोत्सवानिमित्त सोलापुरातील पद्मशाली बांधवांकडून यंदाही पद्मावतीदेवीला माहेरची साडी अर्पण करण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी हा धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावतीदेवी या पद्मशाली समाजाच्या कन्या असल्याची समाजाची श्रद्धा आहे. त्यामुळे पुरातन काळापासून पद्मशाली समाजाला देवीला साडी-चोळी अर्पण करण्यासह ओटीभरण्याचा मान मिळत असल्याचे बिंगी यांनी सांगितले.तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. गेल्या १७ वर्षांपासून सोलापुरातील पद्मशाली बांधवांना या उत्सवादरम्यान देवीला ‘माहेरची साडी’ अर्थात ‘पुट्टींटी पट्टूचिरा’ अर्पण करण्याचा मान मिळत आहे.यंदाच्या कार्यक्रमासाठी सोलापुरातील समाजबांधव ८ डिसेंबर रोजी तिरुपतीकडे रवाना होणार आहेत. यंदाच्या ब्रह्मोत्सवात साडी अर्पण कार्यक्रमाचे प्रमुख यजमान पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे हे आहेत.या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पद्मशाली बांधवांसाठी प्रतिव्यक्ती ४ हजार १ रुपये देणगी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये साडी अर्पण कार्यक्रमातील सहभाग, प्रवास, निवास, भोजन तसेच बालाजी दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.या पत्रकार परिषदेला प्रा. व्यंकटेश पडाल, नागेश सरगम, रामचंद्र जन्नू, गोपी वडेपल्ली, दामोदर पासकंटी, व्यंकटेश रच्चा आणि पंडित वेणुगोपाळ जिल्ला आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande