अमरावती : जुना धामणगावच्या पाटबंधारे कार्यालयात कर्मचारी गैरहजर; शेतकऱ्यांची कामे रखडली
अमरावती, 14 ऑगस्ट (हिं.स.) धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव येथील उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रमांक ३ मध्ये कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यालयात बहुतांश कर्मचाऱ्यांच्या खुर्च
जुना धामणगावच्या पाटबंधारे कार्यालयात कर्मचारी गैरहजर; शेतकऱ्यांची कामे रखडली


अमरावती, 14 ऑगस्ट (हिं.स.) धामणगाव रेल्वे तालुक्यातील जुना धामणगाव येथील उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रमांक ३ मध्ये कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार्यालयात बहुतांश कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या आढळून आल्याने पाटबंधारे विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यालयात एकूण १३ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, पाहणीदरम्यान कार्यालयात केवळ दोन ते तीन कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे कार्यालयातील थंब मशीनदेखील बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचारी कार्यालयात नियमित उपस्थित राहतात की नाही, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पाटबंधारे विभागाशी संबंधित विविध कामांसाठी शेतकऱ्यांना या कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. मात्र अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची कामे रखडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिंचन, पाणीवाटप आणि इतर प्रशासकीय कामांसाठी आलेल्या शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. कार्यालयीन वेळेत कर्मचारी गैरहजर असताना हजेरीपटावर त्यांची उपस्थिती नोंदविली जात असल्यास ही बाब अधिक गंभीर ठरणार आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या प्रकाराची दखल घेऊन सिंचन विभागाचे मुख्य अभियंता संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे आता शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande