
कोल्हापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेला भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
टिंबर मार्केटसह शहरातील विविध महापालिका चाळींमध्ये वास्तव्यास असलेल्या ३५ सफाई कर्मचाऱ्यांना राहती घरे देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या पुढाकाराने मार्गी लागला असून, त्यातील ४ कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते हस्तांतर पत्रे वाटप करण्यात आली. वारसा हक्काच्या नियुक्तीअंतर्गत २ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली, तसेच 'नमस्ते' कार्यक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. संभाजीनगर येथे १०४ सदनिकांच्या दोन नवीन इमारतींच्या (प्रत्येकी ३६० चौ. फूट कारपेट क्षेत्र) प्रस्तावित डीपीआरचे सादरीकरण करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या बँकेमार्फत १ कोटींचे अपघाती विमा, ५ लाखांचे नैसर्गिक मृत्यू विमा आणि कुटुंबासाठी ५ लाखांचे आरोग्य विमा संरक्षण देण्याबाबत आयोगाच्या अध्यक्षांनी सूचना केली. तसेच समाज कल्याण विभागामार्फत विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश दिले.
यावेळी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर आणि उपस्थित मान्यवरांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या गतिमान प्रशासकीय कार्याचे विशेष कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar