
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय संस्कृती, परंपरा आणि कारागिरांच्या कौशल्याचा समृद्ध वारसा एकाच छताखाली अनुभवण्याची संधी देणाऱ्या ‘स्वदेशी एक्स्पो २०२६’ मध्ये भारतीय हस्तकला व हातमाग वस्त्रांच्या विविध दालनांची अप्रतिम कलाकुसर नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे. १४ ते १६ ऑगस्ट या तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनास पहिल्या दिवशी चोखंदळ ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
केंद्रीय सूक्ष्म, मध्यम व लघु उद्यम मंत्रालयाच्यावतीने छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी चिकलठाणा येथील सागर रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात, देशाच्या विविध भागांतून आलेल्या कारागिरांनी आणि विणकरांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. या स्वदेशी एक्स्पोचे केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खडसे यांच्यासह उपस्थित आमदार अनुराधाताई चव्हाण व इतर मान्यवरांनी प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देत उत्पादनांची माहिती जाणून घेतली.
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांच्या पारंपरिक कलांना व वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. हातमागावर विणलेल्या वस्त्रांमागील कारागिरांचे कौशल्य, पारंपरिक तंत्रज्ञान आणि स्थानिक संस्कृतीची झलक या दालनांमधून अनुभवता येते.
आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना वेगळ्या पद्धतीचे गिफ्ट देण्याची अभिरुची ठेवणाऱ्यांसाठी हा 'एक्स्पो ' पर्वणी ठरणारा आहे.जिल्हा प्रशासनाने केंद्रशासनाच्या मदतीने सुरू असलेल्या या स्वदेशी 'एक्सपो 'ला मोठ्या संख्येने भेट देण्याच्या आवाहन केले आहे.14, 15 व 16 ऑगस्ट या काळात नागरिकांनी सहकुटुंब या ठिकाणी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
महिला उद्योजक, स्वयंसहाय्यता गट, ग्रामीण कारागीर आणि पारंपरिक कलाकारांनी तयार केलेल्या उत्पादनांनाही एक्स्पोमध्ये स्थान देण्यात आले आहे. पारंपरिक हातमागावरील साड्या, ड्रेस मटेरियल, शाली, दुपट्टे, कापडांच्या विविध प्रकारांसह कलात्मक हस्तकला वस्तू येथे पाहता व खरेदी करता येत आहेत. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याबरोबरच स्थानिक व पारंपरिक कारागिरांना थेट बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘स्वदेशी’चा संदेश :
भारतीय हस्तकला व हातमाग उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, कारागिरांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर वाढवणे, हा एक्स्पोचा प्रमुख उद्देश आहे. विविध राज्यांतील पारंपरिक कला, वस्त्रे आणि हस्तकला यामुळे एक्स्पोला भेट देणाऱ्या नागरिकांना भारताच्या विविधतेतील सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव मिळत आहे.
या प्रदर्शनामध्ये ७५ हून अधिक प्रकारची दालने थाटण्यात आली आहेत. ओडिशाची 'पट्टाचित्र' कला, राजस्थानची विलोभनीय 'पिचवाई' कलाकृती, झारखंडची पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण 'सोहराई' कला, बिहारच्या मधुबनीची 'मधुबनी' कला, पाटण्याची टिकुली पेंटिंग, उत्तराखंड-हिमालयाची पारंपरिक 'ऐपण' कला, सुंदर हस्तकला आणि महाराष्ट्राची शान असलेल्या अस्सल 'पैठणी'ने ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
स्वदेशी एक्स्पोमध्ये खरेदीसोबतच विविध कलांचे प्रत्यक्ष दर्शन, कलाकारांशी संवाद आणि पारंपरिक उत्पादनांच्या निर्मितीची माहिती घेण्याची संधीही उपलब्ध असल्याने नागरिकांनी या उपक्रमाला भेट देऊन भारतीय कारागिरांच्या कलाकौशल्याला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis