
अमरावती, 14 ऑगस्ट (हिं.स.)
काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्द्वानी (उत्तराखंड) येथील रामलीला मैदानावरील सभेनंतर त्यांनी उपस्थिती लावलेल्या मंचाचे कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी तीव्र निषेध केला आहे. खरगे हे दलित समाजाचे असल्यामुळे जातीय मानसिकतेतून हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून, आधुनिक भारताच्या प्रगतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये रुजविली. मात्र, अशा घटनांमुळे समतेच्या विचाराला धक्का बसत असल्याची खंत बोरकर यांनी व्यक्त केली.स्वातंत्र्याच्या दशकांनंतरही जातीय भेदभावाच्या मानसिकतेतून असे प्रकार घडत असतील, तर देश प्रगतीऐवजी मागे जात असल्याचेच म्हणावे लागेल, अशी टीका त्यांनी केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्राच्या गृह विभागाकडे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व राष्ट्रीय रिपाइं खोब्रागडे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.--------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी