
अमरावती, 14 ऑगस्ट (हिं.स.)
देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हर घर तिरंगा अभियानांतर्गत दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयात भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी 'जेन झी' (Gen Z) आणि 'जेन अल्फा' (Gen Alpha) या नवोदित पिढीसोबत अत्यंत आपुलकीने आणि त्यांच्याच भाषेत थेट संवाद साधला. देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील '२०४७ चा समृद्ध आणि विकसित भारता'चे स्वप्न साकार करण्याची खरी जबाबदारी आजच्या युवा पिढीच्या खांद्यावरच आहे, असे प्रतिपादन यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशाचे भविष्य घडवण्यासाठी नवोदित पिढीने पुढे यावे, असे आवाहन करत त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या तंत्रज्ञान, शिक्षण आणि तरुणांसाठीच्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.या प्रसंगी प्रबोधन विद्यालयाचे चेअरमन जयसिंग देशमुख, विश्वस्त ॲड. संतोष धर्माधिकारी, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश नेते सलीम घानिवाले, भाजपा शहराध्यक्ष मेघा भारती, रवींद्र ढोकणे, गटनेते दिनेश पारडे, कृष्णा स्वामी, नगरसेवक रोशन कट्यारमल, आरती वाबळे यांच्यासह शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी