
देवळा, 14 ऑगस्ट (हिं.स.) : विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्गावर देवळा शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या रामेश्वर फाट्यानजीक गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास झालेल्या बस व मोटारसायकल यांच्या अपघातात तीन मजूर जागीच ठार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अपघातग्रस्त बस पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की विंचूर-प्रकाशा या राष्ट्रीय महामार्गावरील देवळा नाशिक रस्त्यावर रामेश्वर फाट्याजवळ काल (दि. १३) रात्री ११ वाजेच्या सुमारास एमएच १४ एलएक्स ७८५१ या क्रमांकाची एस. टी. बस व दुचाकी (क्रमांक एमएच १७, एवाय २३४१) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. हे तिघे मजूर असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच देवळा पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता, की एस. टी. बसच्या दुचाकीला बसलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील तिघे जण बसच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या मेंदूचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने मृतांची ओळख पटणे अवघड झाले आहे.
पोलिसांकडून त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न चालू आहेत. दरम्यान, या अपघातातील मृत व्यक्तींच्या मिळालेल्या आधार कार्डवरून एकाची ओळख पटली असून, त्याचे नाव अंबादास यशवंत कुवर (रा. अजंग वडेल, ता. मालेगाव) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातातील तिन्ही मृत व्यक्तींना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवळा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI