
फ्युचर स्कील कॅम्प’च्या रोबोटिक लॅबमध्ये उमरखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना ड्रोन निर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव
यवतमाळ, १४ ऑगस्ट (हिं.स.) : आधुनिक तंत्रज्ञानाच्या संधी केवळ शहरातील विद्यार्थ्यांपुरत्याच मर्यादित राहतात, हा समज दूर करत ग्रामीण विद्यार्थ्यांनाही भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्याचा अभिनव उपक्रम उमरखेड तालुक्यातील श्री तेजमल गांधी विद्यालय, ब्राह्मणगाव आणि श्री शिवाजी विद्यालय, चातारी येथे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ड्रोनचे विविध भाग समजून घेत स्वतः ड्रोनची जोडणी केली आणि त्यानंतर तयार केलेला ड्रोन प्रत्यक्ष हवेत उडवून पाहिला.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ड्रोनची रचना, त्यातील विविध भाग आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तयार ड्रोन केवळ पाहण्याऐवजी विद्यार्थ्यांनी त्याचे सुटे भाग स्वतः हाताळून योग्य पद्धतीने जोडण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर स्वतः तयार केलेल्या ड्रोनचे प्रत्यक्ष उड्डाण करून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानातील बारकावे समजून घेतले.
या प्रत्यक्ष अनुभवातून ‘ड्रोन कसा उडतो?’ आणि ‘तो नेमका कसा काम करतो?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना कृतीतून मिळाली. ड्रोन तयार करताना आलेल्या अडचणी सोडविणे, निरीक्षण करणे, चुका ओळखणे आणि पुन्हा प्रयत्न करणे या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याच्या क्षमतेलाही चालना मिळाली.
विविध क्षेत्रांत वाढता वापर
सध्याच्या काळात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केवळ छायाचित्रण आणि चित्रीकरणापुरता मर्यादित राहिलेला नाही. शेतीमध्ये फवारणी, जमिनीचे डिजिटल सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय वाहतूक तसेच संरक्षण क्षेत्रातही ड्रोनचा वापर वाढत आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि करिअरच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत आधुनिक कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देण्यात येत आहे.
कल्पनांना तंत्रज्ञानाचे पंख
‘फ्युचर स्कील कॅम्प’च्या रोबोटिक लॅबमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला सर्जनशीलतेची जोड दिली जात आहे. याच उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ड्रोनचे भाग स्वतः जोडून तो प्रत्यक्ष उडविण्याचा अनुभव घेतला. ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देतानाच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि नवोपक्रमाची भावना निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया अॅड. अर्चना माने यांनी दिली.
---------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी