
- राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक कार्यशाळेचे उद्घाटन
- १५० रासेयो स्वयंसेवक सहभागी
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। महाविद्यालयीन जीवनात विदयार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांच्या मर्यादेपलीकडे जाऊन जग समजून घेतले पाहिजे. तसेच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कार्यशाळेचे उद्घाटन कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यवस्थापन तज्ज्ञ निलेश सुराणा हे अतिथी म्हणून उपस्थित होते तर संचालक डॉ सोमनाथ खाडे, संचालक डॉ भरती गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यशाळा सुरु असून १५० रासेयो स्वयंसेवक सहभागी झाले.
उद्घाटनपर भाषणात डॉ. प्रशांत अमृतकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांच्या मर्यादेपलीकडे जाऊन एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन केले. एक चांगला मनुष्य बनणे हेच उत्तम भारत आणि उत्तम जगाच्या निर्मितीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक राजकारण, अर्थकारण तसेच पर्यावरण या क्षेत्रांतील विविध उदाहरणे देत त्यांनी कार्बन फूटप्रिंटसारख्या ज्वलंत प्रश्नाचे गांभीर्य विशद केले. येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी हे जग अधिक चांगले बनविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी सर्वंकष दृष्टिकोन बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले. उद्याच्या सुदृढ आणि सक्षम भारतासाठी विद्यार्थ्यांनी एक चांगला माणूस म्हणून पुढे यावे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्राच्या संचालक डॉ. भारती गवळी यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेमागील संकल्पना, तिची आवश्यकता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील एनएसएसची भूमिका विशद केली. डॉ. सोमीनाथ खाडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून आजच्या भारतात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी एनएसएसकडे केवळ अभ्यासक्रमाचा एक घटक म्हणून न पाहता समाजाशी जोडले जाण्याची आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याची संधी म्हणून पाहावे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही दोन दिवसीय कार्यशाळा प्रभावीपणे पार पडली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत पदवी राष्ट्रीय सेवा योजना हा अभ्यासक्रमाचा एक महत्त्वपूर्ण व अनिवार्य घटक म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. केवळ वर्गातील शिक्षणाच्या मर्यादेत न राहता विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, नागरिकत्वाची जाणीव आणि सेवाभाव यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे, हा या कार्यशाळेमागील व्यापक उद्देश आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या मूळ उद्दिष्टांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ सक्षम व्यावसायिक नव्हे, तर सुजाण, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याचा प्रयत्न या कार्यशाळेतून करण्यात येत आहे. “स्वतःचा विकास करताना समाजाचा विकास आणि समाजाच्या विकासात राष्ट्रनिर्माण” या व्यापक भावना केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक संवेदनशीलता, नेतृत्वगुण आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ करणारी ठरणार आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis