
अमरावती, 14 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यांपैकी जुलै २०२६ मध्ये वरुडचे ठाणेदार यांनी उत्कृष्ट कामकाज केल्याने त्यांचा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी प्रशस्तिपत्र व गौरवचिन्ह देऊन सत्कार केला. आयोजित एका समारंभात वरुडचे ठाणेदार अशोक जाधव यांच्यासह इतरही ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मोर्शी पोलिसांनी तांत्रिक पुराव्याचे विश्लेषण करून गुन्हा उघडकीस आणला. तसेच खोलापूर पोलिसांनीही अशाच पद्धतीचा दुसरा गुन्हाही उघडकीस आणला होता. त्यामुळे मोर्शी व खोलापूरचे पोलिस अधिकारी तसेच तपास कर्मचाऱ्यांचाही यावेळी एसपींनी सत्कार केला. स्थानिक गुन्हे शाखेने लोणी ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास केला. लूटमार करणाऱ्या पाच जणांची निश्चिती करून तिघांना अटक केली होती व लोणीहद्दीत लाखोंचा गांजा जप्त केला होता. त्यांचाही पोलिस अधीक्षकांनी गौरव केला. शिवाय ग्रामीण पोलिसांनी महिलांविरुद्धचे गुन्हे २४ तासांत उघडकीस आणले. पकड व अटक वॉरंटची तत्काळ अंमलबजावणी करणे, सीसीटीएनएसमध्ये गुणत्तापूर्वक गुन्ह्यांचा तपास, अवैध गांजा, दारू विक्रेत्यांवर वचक निर्माण करणे, हरविलेल्या मुलींचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याची उल्लेखनीय कामगिरीसुद्धा केली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभाला अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवार उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी