
छत्रपती संभाजीनगर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपपरिसराचा २२ वा वर्धापनदिन येत्या १६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. 'स्वरातीम' विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर हे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्राची स्थापना १६ ऑगस्ट २००४ रोजी करण्यात आली. १६ ऑगस्ट २००९ रोजी उपकेंद्राचे रुपातंर उपपरिसरात करण्यात आले. यंदाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण, व्यवस्थापन परिषद बैठक, जीवन साधना पुरस्कार वितरण आदी कार्यक्रम होणार आहे. व्यवस्थापन परिषदेची बैठक झाल्यानंतर सकाळी ९ वाजता वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा होईल. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मा.कुलगुरु डॉ.मनोहर चासकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उपपरिसर मंडळाचे अध्यक्ष, प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते अध्यक्षस्थानी राहणार आहेत. यावेळी प्रख्यात साहित्यिक योगीराज देवराव वाघमारे यांना जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित करणार येणार आहे. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषद सदस्य बसवराव मंगरुळे, डॉ.अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ.रमेश चौघुले यांनी केले.
योगीराज वाघमारे यांना जीवनसाधना पुरस्कार
विद्यापीठ दिन व उपपरिसर वर्धापन दिन अशा दोन्ही दिवशी जीवनसाधना पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. यंदाच्या पुरस्कार निवडीसाठी कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी तज्ज्ञांची शोध समिती गठित केली. सदर समितीच्या शिफारशीवरुन प्रख्यात मराठी साहित्यिक योगीराज देवराव वाघमारे यांची उपपरिसरच्या जीवन साधना पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. श्री.वाघमारे हे माजी शिक्षणधिकारी असून त्यांनी विपूल लेखन, सामाजिक कार्य केले आहे. त्यांच्या या संपूर्ण कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis