

रायगड, 14 ऑगस्ट (हिं.स.)। पावसाळ्यात दिव्यांग बांधवांना उदरनिर्वाहासाठी घराबाहेर पडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील ४२ दिव्यांग बांधवांना विनायक वसंत पाबळे फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्य व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
किरवली येथील साईबाबा मंदिराजवळील शेळके बंधू मंगल कार्यालयात हा उपक्रम उत्साहात पार पडला. ‘सेवाभाव हीच खरी मानवता’ आणि ‘गरजूंना मदत, मानवतेची जपणूक’ या उद्देशाने फाउंडेशनने हा उपक्रम राबविला. पावसाळ्यात रोजगाराच्या संधी कमी होऊन आर्थिक अडचणी निर्माण होणाऱ्या दिव्यांग कुटुंबांना या मदतीमुळे मोठा आधार मिळाला.
यावेळी विनायक पाबळे यांच्या मातोश्री आवर्जून उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना प्रोत्साहन दिले. याप्रसंगी विनायक पाबळे म्हणाले की, फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात गरजूंना मदत करण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. कर्जत तालुक्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा मानस असून, भविष्यातही दिव्यांग बांधवांच्या पाठीशी संस्था खंबीरपणे उभी राहील. तसेच कर्जत परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल अपंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थितांनी विनायक पाबळे, त्यांच्या मातोश्री आणि फाउंडेशनचे आभार मानले. कार्यक्रमास प्रभाकर शेळके, महेंद्र ठाणगे, अपंग संघटनेचे अध्यक्ष अमर साळुंखे, पोलीस पाटील विवेक बडेकर, सावंत यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)