
नवी दिल्ली , 14 ऑगस्ट (हिं.स.)।अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घोषणा केली की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया वीरेंद्र सिंह बसोया याला संयुक्त अरब अमिरातीमधून (युएई) भारतात परत आणले आहे.
गृहमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत सांगितले की, मोदी सरकार परदेशात लपून बसलेल्या ड्रग तस्करांचा सातत्याने शोध घेत असून, त्यांच्या संपूर्ण नेटवर्कचा अत्यंत कठोरपणे नायनाट करत आहे.अमित शाह यांनी सांगितले की, एनसीबीकडून बसोयाला युएईमधून भारतात परत आणणे हे देशातील अमली पदार्थांविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’ धोरणातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
ते पुढे म्हणाले की, आपल्या तपास यंत्रणांनी गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी ‘वरून खाली आणि खालून वर’ अशा दोन्ही पद्धतींचा अवलंब केला आहे.यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, ड्रग तस्कर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात लपून बसले तरी ते भारतीय कायद्याच्या लांब हातापासून वाचू शकत नाहीत.
वीरेंद्र सिंह बसोया हा एका आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जाते. तो दीर्घकाळापासून कायद्याच्या कचाट्यातून दूर होता.त्याला भारतात परत आणणे हे देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे यश मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode