
रत्नागिरी, 14 ऑगस्ट (हिं.स.) । भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आपले सर्वस्व गमावलेल्या आणि प्राणांची आहुती दिलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासोबतच नव्या पिढीला फाळणीच्या इतिहासाची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने मधू दंडवते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजापूर येथे विभाजन विभीषिका स्मृती दिन साजरा करण्यात आला.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. युवराज बंडोपंत माळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. फाळणीची ऐतिहासिक पार्श्वभूमी, फाळणीची कारणे आणि त्यानंतर देशावर झालेले सामाजिक व मानवी परिणाम याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
यावेळी प्रा. माळवी म्हणाले, फाळणीच्या काळात जात-धर्माच्या नावावर माणसांमध्ये भिंती उभ्या राहिल्या. आज त्या भिंती पाडण्याची गरज आहे. आपण कितीही वेगळे असलो तरी ‘सर्वप्रथम भारतीय’ ही भावना मनात रुजवली पाहिजे. देशाचा विकास शांतता आणि एकतेतूनच शक्य आहे. देशाची एकता आणि अखंडता जपण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी फाळणीतील पीडितांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे निदेशक बी. ए. प्रभावळकर, ए. एस. पावसकर, आर. ए. मुल्ला, व्ही. व्ही. पवार, डी. एस. पवार तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी