
रत्नागिरी, 14 ऑगस्ट (हिं.स.) । रानभाज्यांचे गुणधर्म लक्षात घेता, त्या केवळ महोत्सवापुरत्या राहू नयेत. त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रिया करण्यासंदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. त्यावर कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी शहरात आज (दि. १४ ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवात ते बोलत होते. कृषी विभाग आणि आत्मा यांनी हा महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवात रानभाज्या आणि तृणधान्यांच्या पाककृतीची, तसेच रील स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.
पालकमंत्री म्हणाले, रानभाज्यांचा व्यावसायिक उपयोग होण्याच्या दृष्टीने काही उपक्रम राबवण्याची गरज आहे. रानभाज्या केवळ दोन-अडीच महिने उपलब्ध असतात. त्या काळात महिलांना आणि बचत गटांना आठवडाभर उपाहारगृह चालवायला देऊन तेथे फक्त रानभाज्यांचे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्याचा प्रयोग करून पाहता येईल. त्यातून महिलांना व्यावसायिक लाभ होऊ शकेल. अशा वेगळ्या उपक्रमांसाठी आवश्यक तो निधी नक्की उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, आमदार किरण सामंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजय बेतिवार आदी मान्यवर उपस्थित होते.
उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह सर्व मान्यवरांनी रानभाज्या विक्रीच्या स्टॉल्सना भेट दिली. तसेच, रानभाज्यांच्या पाककृतींची चवही चाखली. गावागावांमधून शेतकरी आणि कष्टकरी महिलांनी रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. गुरुवर्य रा. पु. जोग संजीवन गुरुकुलच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी लावलेला रानभाज्या विक्रीचा स्टॉलही लक्ष वेधून घेत होता. रानभाज्यांची माहिती देणारे फलक, तसेच त्यांच्या रोपांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. या वेळी शेतीशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्यानेही झाली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
रानभाजी पाककला स्पर्धा
प्रथम क्रमांक : संयुक्ता विशाल मोरे, नरवण, ता. गुहागर
पदार्थाचे नाव : वाफवलेला थ्री लेअर रानपिझ्झा
द्वितीय क्रमांक : स्वप्नाली संजय भागवत, लांजा
पदार्थाचे नाव : रानभाजी नूडल्स व लाडू
तृतीय क्रमांक : सौ. प्रज्ञा जयंत फडके, जांभूळआड, रत्नागिरी
पदार्थाचे नाव : राणदात्री
पौष्टिक पाककला स्पर्धा
प्रथम क्रमांक : वैशाली श्रीपाद देवदास, रत्नागिरी
पदार्थाचे नाव : बाजरीची पौष्टिक खिचडी
द्वितीय क्रमांक : सौ. साक्षी सम्राट पाटील, रत्नागिरी
पदार्थाचे नाव : पौष्टिक फालुदा
तृतीय क्रमांक : स्वाती सुनील पारकर, रत्नागिरी
पदार्थाचे नाव : प्रोटीनयुक्त नाचणी लाडू
रील स्पर्धा विजेते
१. निकिता संदीप नाचणेकर, कोदवली, ता. राजापूर
२. उल्का पटवर्धन, नाचणे, रत्नागिरी
३. साहिल राजेंद्र सकपाळ – खेड
४. वैभव आमरे, राजापूर – उत्तेजनार्थ
५. अनुष्का मोहिते, खेड – उत्तेजनार्थ
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी