
पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज पुणे स्टेशन बसस्थानकाची पाहणी केली.
यावेळी मंत्री सरनाईक यांनी हिरकणी कक्ष, पानपोई, प्रसाधनगृहांसह प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या विविध मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.
बसस्थानकातील स्वच्छता, प्रसाधनगृहांची नियमित देखभाल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच महिला प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील काही प्रवाशांशी संवाद साधून एसटी बससेवेबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले. प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी, बससेवेची गुणवत्ता आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी थेट अभिप्राय घेतला.
“एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बससेवा देण्याबरोबरच स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. स्वच्छता हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय अथवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
प्रवाशांच्या सोयी-सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत बसस्थानकांची नियमित पाहणी करावी आणि आढळणाऱ्या त्रुटींचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु