
कर्जमाफी, पीकविमा, गायरान जमिनींसह खतांच्या तुटवड्याच्या प्रश्नावर चर्चा
पुणे, १४ ऑगस्ट (हिं.स.) : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्रिस्तरीय बैठक झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते, तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
बैठकीत शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, पीकविमा, इनाम व गायरान जमिनी, भूमिहीन कुटुंबांना घरासाठी जागा, तसेच खतांचा तुटवडा आणि लिंकिंगच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आवश्यक कार्यवाही करून संबंधित विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
बैठकीला संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु