
सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची भावना आणि राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दलचा अभिमान सदैव जागृत राहावा. तिरंगा हा केवळ ध्वज नसून तो देशाच्या स्वातंत्र्याचा, शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी केले.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत दहिटणे येथील समाधान माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. देशभक्तीपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिणीताई तडवळकर होत्या. यावेळी नगरसेवक प्रा. नारायण बनसोडे, ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे शहर संयोजक शशी थोरात, अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे शहराध्यक्ष प्रवीण कांबळे, संगीता कोळेकर, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, दहिटणे गावचे चंद्रकांत भक्ते, तानाजी गव्हाणे, संतोष मंठाळकर, संतोष नकाशे, रविकांत कोसगी, महेशसिंग दिक्कीत तसेच समाधान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक इरफान शेख उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तडवळकर म्हणाल्या की, ‘हर घर तिरंगा’ हे केवळ घराघरांवर राष्ट्रध्वज फडकविण्याचे अभियान नसून प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागविणारे अभियान आहे. विद्यार्थ्यांनी तिरंग्याचा सन्मान राखत देशाच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर राहावे. हातात घेतलेला तिरंगा हा भविष्यातील सक्षम भारताची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची जाणीव करून देतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. नारायण बनसोडे आणि प्रवीण कांबळे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात योगदान द्यावे, राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा आणि देशभक्तीची भावना आपल्या आचरणातून जपावी, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड