
पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
पुणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांना झुकते माप दिले जात असून, महापालिकेच्या सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याची गंभीर तक्रार उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.महापालिकेतील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी आयुक्तांना निवेदन सादर करून आपली नाराजी व्यक्त केली. निवेदनानुसार, मुख्याधिकारी (सीओ) पदावरील प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना कामकाजात प्राधान्य दिले जाते आणि त्यांच्याशी सन्मानपूर्वक वर्तन केले जाते. मात्र, महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांशी अपमानास्पद भाषेत संवाद साधला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.महिला अधिकाऱ्यांशी बोलताना शासकीय शिष्टाचाराचे पालन केले जात नसल्याचाही मुद्दा निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. तसेच कार्यालयीन चर्चा आणि बैठकीदरम्यान वापरली जाणारी भाषा अशोभनीय असल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.या तक्रारीमुळे महापालिकेच्या प्रशासनातील कार्यपद्धती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आयुक्त या प्रकरणाची दखल घेऊन काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु