
पुणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)। जलसंधारणाबाबत जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी पुण्यात २१ ऑगस्ट रोजी ‘महा पदयात्रा – पाण्यासाठी’ आयोजित करण्यात आली आहे. पुणेकरांनी आपल्या पुढील पिढीच्या जलसुरक्षित भविष्यासाठी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. शिवाजीनगर येथील पोलिस परेड ग्राउंडपासून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. ‘माती वाचवा, पाणी वाचवा, भविष्य सुरक्षित करा’ ही या पदयात्रेची संकल्पना असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे, मातीचे संवर्धन करणे आणि जलसुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
“आज जपलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा उद्याच्या पिढीसाठीची मोठी गुंतवणूक आहे. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून आपल्या जीवनाचा आणि भविष्यातील विकासाचा आधार आहे. त्यामुळे जलसंधारणाची जबाबदारी शासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारणे आवश्यक आहे,” असे डुडी यांनी स्पष्ट केले. या पदयात्रेत युवक, विद्यार्थी, महिला, नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक व स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच जलसंधारण क्षेत्रात कार्यरत विविध घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पदयात्रेत सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे. “चला, पाण्यासाठी एकत्र चालूया आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी जलसुरक्षित भविष्य घडवूया,” असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. पदयात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु