म्हैसाळ योजनेचे पाणी न आल्याने पिके धोक्यात; शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी
सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने आणि म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात न आल्याने तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पाणीसाठा संपत चालल्याने तलावालगतच्या ११ ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्य
म्हैसाळ योजनेचे पाणी न आल्याने पिके धोक्यात; शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी


सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने आणि म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात न आल्याने तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पाणीसाठा संपत चालल्याने तलावालगतच्या ११ ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके जळून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तालुक्यात नदी, उजनी आणि म्हैसाळ कालव्याचे लाभक्षेत्र वगळता शिरनांदगी तलावामुळे शिरनांदगी, चिक्कलगी आणि महमदाबाद परिसरातील १ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला बागायतीचा लाभ झाला आहे. गेल्या दोन वर्षांत हा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहिले होते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी असून तलावातील पाणीसाठा कमी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर पिके वाचवण्याचे संकट निर्माण झाले आहे.

दरम्यान, रड्डे येथील सरपंचांनी कालव्याच्या वितरिकेतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप तलावालगतच्या शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

म्हैसाळ योजनेचे पाणी तलावात सोडण्यात न आल्याने दोन गावांतील शेतकऱ्यांमध्ये वादही निर्माण झाला होता. दरवर्षी म्हैसाळच्या वितरिकेतून शिरनांदगी तलावात पाणी सोडण्याची मागणी केली जाते. यंदाही पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.

पावसाळ्यात कृष्णा नदीतून वाहून जाणारे पाणी शिरनांदगी तलावात सोडल्यास तलावावर अवलंबून असलेल्या शेतीपिकांना दिलासा मिळू शकतो, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाइपलाइनही उभारल्या आहेत. यासाठी सोसायट्या, राष्ट्रवादी बँका आणि पतसंस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे. त्यामुळे तलावात पाणी उपलब्ध न झाल्यास पिकांसोबतच शेतकऱ्यांच्या कर्जफेडीचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शिरनांदगी तलावात तातडीने पाणी सोडून शेतीपिके वाचवावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande