
सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। महापालिकेच्या मोक्याच्या जागा बीओटी तत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. यापूर्वी बीओटी तत्त्वावर देण्यात आलेल्या महापालिकेच्या जागांचा संपूर्ण लेखाजोखा जाहीर केल्यानंतरच नव्या जागांचा विचार करावा, अशी मागणी शिवसेनेने केली.
जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर आणि महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देत शहरातील महापालिकेच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
महापालिकेने यापूर्वी बीओटी तत्त्वावर दिलेल्या जागांचा सविस्तर आढावा घेऊन त्या माध्यमातून महापालिकेला प्रत्यक्ष किती उत्पन्न मिळाले, याची माहिती सार्वजनिक करावी. जुन्या प्रकल्पांचा लेखाजोखा स्पष्ट झाल्यानंतरच नव्या जागा बीओटी तत्त्वावर देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
होटगी रोडच्या रस्त्याच्या कामात कंत्राटदाराकडून कथित निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही शिवसेनेने आयुक्तांकडे केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड