
सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबरोबरच त्यांचा प्रभावी तपास आणि नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस अधिकारी व तपासी अंमलदारांसाठी एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (गुन्हे), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी सायबर गुन्ह्यांचे प्रतिबंध, प्राथमिक तपास, डिजिटल पुरावे, आर्थिक सायबर फसवणुकीतील ‘गोल्डन अवर’, १९३० हेल्पलाइन, NCRP पोर्टल, मोबाईल आणि सोशल मीडिया सुरक्षा यांसह विविध तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ अविनाश पाटील यांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासातील तांत्रिक बाबींची माहिती दिली. तसेच आर्थिक सायबर फसवणूक झाल्यानंतर नागरिकांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यपद्धतीबाबत प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर फसवणुकीच्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे महत्त्व, डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवण्याची पद्धत आणि उपलब्ध तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर याबाबतही पोलिसांना माहिती देण्यात आली.
या चर्चासत्रासाठी पोलीस फौजदार श्रीरंग कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक इंगळे तसेच सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड