श्री रेवणसिद्धेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरणाच्या कामाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते उद्घाटन
सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)। श्री रेवणसिद्धेश्वर देवस्थान परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसरातील विकासकामांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत
fgdf


सोलापूर, 14 ऑगस्ट (हिं.स.)।

श्री रेवणसिद्धेश्वर देवस्थान परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसरातील विकासकामांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मिलिंद थोबडे आणि नगरसेवक किसन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करून तो पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. मंदिरासह परिसरातील विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येत असून, या माध्यमातून सोलापूरच्या पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या विकासासाठी ६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी २ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. देवस्थान समितीच्या सूचनेनुसार ६८ लिंगांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे कोठे यांनी सांगितले.

तसेच प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी २१ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून, त्यापैकी ७ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तलावाचा विकास करून परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरसेवक किसन जाधव यांच्या प्रयत्नातून रेवणसिद्धेश्वर मंदिरातील गाभारा, शिखर आणि आवारातील फरशीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मंदिर परिसरातील उर्वरित विकासकामेही पूर्ण करून श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर, प्राणिसंग्रहालय आणि धर्मवीर संभाजी तलाव असा एकात्मिक पर्यटन परिसर विकसित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार कोठे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande