सोलापूर - जिल्ह्यातील शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी
सोलापूर, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावरून चांगलीच गाजली. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळून विद्यार्थी आणि
सोलापूर - जिल्ह्यातील शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी


सोलापूर, 14 ऑगस्ट, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा परिषदेची गुरुवारी झालेली सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावरून चांगलीच गाजली. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळून विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेचे पडसाद सभागृहात उमटले. या घटनेवरून जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी प्राथमिक माहितीनुसार साडीच्या झोक्यामुळे छताचे प्लास्टर ढासळल्याचे सांगितले होते. मात्र, ही बाब सदस्यांना मान्य झाली नाही. या मुद्द्यावरून सदस्य आणखी आक्रमक झाले.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे, शांभवी कल्याणशेट्टी, प्रवीण तानवडे, श्रुती बोरगुंडे आणि नेताजी खंडागळे यांनी या विषयावर प्रशासनाला जाब विचारला. शिवराज म्हेत्रे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणावर आक्षेप घेत, छत कोसळण्यामागे साडीचा झोका कारणीभूत नसल्याचे सांगत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शांभवी कल्याणशेट्टी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी केली. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शिक्षण विभागाने शाळांच्या इमारतींची नियमित तपासणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.

दरम्यान, सभेत सांगोल्याचे सदस्य दादासाहेब लवटे यांनी विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा मुद्दा उपस्थित करत शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे शिक्षण विभागातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून सभागृहात वातावरण तापले.

कुर्डू येथील सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी शाळेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा मुद्दा मांडला. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेसाठी जागेची मागणी करूनही ती उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने शाळेसाठी जागेची व्यवस्था करावी आणि त्यासाठीचे भाडे सेस फंडातून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande